Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Akkalkot Darshan

श्रीक्षेत्र अक्कलकोट ...

श्रीस्वामी वास्तव्याने पुनित श्री वटवृक्ष देवस्थान :

सध्या ज्या मंदिरात भाविक प्रामुख्याने दर्शनाला येतात ते मंदिर म्हणजे वटवृक्ष मंदिर होय. इथे स्वामी महाराज वडाच्या झाडाखाली अनुष्ठानाला बसत असत. तिथे एक खाऱ्या पाण्याची विहीर होती पण, स्वामींनी तिचे पाणी गोड केले. याच विहिरीतले पाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिळते आहे. स्वामी देह ठेवण्यापूर्वी निरवानिरवीची भाषा बोलायला लागत तेव्हा त्यांचे एक पट्टशिष्य जोतिबा पांडे यांनी त्यांना प्रश्र्न केला. "महाराज, तुम्ही गेल्यावर आम्हांला कोण आहे?' त्यावर महाराज म्हणाले, "तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच मी तुमच्या सन्निध आहे.' तेव्हा या वटवृक्षाजवळच पांडे यांनी 8 बाय 8 फूट या आकाराचे छोटे मंदिर बांधले व तिथे रोजच्या रोज पूजेला ब्राह्मण नेमून दिला. सध्याच्या मंदिरातील गर्भगृह त्यांनीच बांधले आहे. महाराजांचे शिष्य बाळप्पा यांचे उत्तराधिकारी गंगाधर स्वामी यांनी नंतर या परिसरात बांधकामे करवून घेतली. वडाच्या झाडाच्या बुंध्याशी स्वामींच्या पादुका ठेवून त्याच्यावर एक छोटेखानी मंदिर बांधले गेले. या मंदिराला चारी बाजूंनी बंद करण्यात आले असून आत डोके घालून पादुकांवर डोके टेकविता येईल एवढे प्रवेशद्वार ठेवले आहे. यातून डोके आत घालून पादुकांवर ते टेकले की मृदंग दुमदुमल्याचा आवाज येतो. तो कोठून येतो याचा तपास कोणी आजवर केलेला नाही. मात्र या आवाजात कधीही खंड पडलेला नाही. नंतरच्या काळात बांधकामे होत गेली व मंदिरात अनेकानेक सुविधा निर्माण होत गेल्या. महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत पण, कोणाही मोठ्या धनाढ्य दानशूर व्यक्तीने दान दिले नसतानाही केवळ भक्तांच्या मदतीने इतकी उत्तम व्यवस्था करणारे हे राज्यातले एकमेव देवस्थान आहे. वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानात कोणत्याही सुविधेसाठी पैसे आकारले जात नाहीत.

श्रीस्वामी समर्थ महाराज समाधी मठ :

स्वामी समर्थांची समाधी असलेले हे मंदिर आहे. चोळप्पा हे स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थांचे वास्तव्य अक्कलकोटमध्ये 21 वर्षे होते. त्या पूर्वी ते सोलापुरात असताना टोळ यांच्या घरी वास्तव्याला होते. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले त्या दरम्यानच्या काळात टोळ यांनाही अक्कलकोटच्या राजांकडे नोकरी लागली. त्यामुळे त्यांनीही अक्कलकोटला घर केले. स्वाभाविकच महाराजही अक्कलकोटच्या मुक्कामात आपल्याच घरी राहतील असे त्यांना वाटले होते पण महाराजांनी ते नाकारले व ते चोळप्पा यांच्या घरी राहिले. चोळप्पा तसे गरीब होते. महाराज त्यांच्या घरी राहिल्यामुळे त्यांच्यावर ताण यायला लागला पण, स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना काही कमी पडले नाही. स्वामींनी त्यांची निष्ठा अनेकदा तपासून पाहिली पण, चोळप्पा कधीही कमी पडले नाहीत. महाराजांनी त्यांना आपल्या पादुका दिल्या व त्यांची पूजा नित्य नियमाने करण्याची सूचना केली. महाराजांनी देह वटवृक्षाखाली ठेवला असला तरी त्यांनी आपली समाधी बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घरीच बांधावी अशी सूचना आपल्या हयातीतच करून ठेवली होती. त्या जागेचे बांधकामही करून घेतले होते. त्या नुसार त्यांची समाधी तेथे बांधण्यात आली आहे. हाच ताे समाधी मठ होय. येथे स्वामींच्या पादुका व चोळप्पा यांच्या वंशजांचे घर तर आहेच पण, समर्थांच्या आवडत्या गाईचीही समाधी येथे बांधण्यात आली आहे.

बुधवार पेठेत श्रीस्वामी समर्थांच्या समाधी मठाच्या मूळ पार्थिव बांधकामावर दक्षिण भारतीय शैलीनुसार मंत्रालय येथील राघवेंद्र स्वामींच्या मठाप्रमाणे राजगोपुरमचे बांधकाम करण्यात आले आहे. गर्भमंदिरावरील इमला पद्धतीच्या बांधकामाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर विविध देवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी समाधी मठावरील बांधकामाची उंची 15 फूट होती ती आता 51 फूट झाली असून रुंदी 21 फूट आहे. नव्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, सदर वास्तूच्या रचनेसाठी दाक्षिणात्य शैलीत निपुण असलेले विश्र्वकर्मा संप्रदायाचे वास्तुशिल्पी व तिरुपती येथील देवस्थानचे वास्तुशिल्पी कै. दक्षिणमूर्ती तेवर शिल्पी यांचे शिष्य श्रीधरन्‌ सन्नाप व श्रीनिवास पांडियन यांनी हे काम पूर्ण केले आहे. तामिळी कलाकारांची कला प्रथमच स्वामींच्या मूळ समाधी मठासाठी वापरण्यात आली आहे.

श्रीस्वामी आज्ञेने स्थापित श्री राजेरायन मठ :

हा मठ अक्कलकोट शहराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या राममंदिराजवळ आहे. हा मठ स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेनेच बांधण्यात आला आहे. हैदराबाद संस्थानातील शंकरराव राजेराय या जहागीरदाराने हा मठ बांधून दिला आहे. शंकरराव राजेराय हे असाध्य व्याधीने त्रस्त होते. त्यांनी अनेक प्रकारचे औषधोपचार केले तरी त्यांना गुण येईना त्यामुळे त्यांनी शेवटी समर्थांच्या कृपादृष्टीचा काही उपयोग होतोय का ते पहावे असा विचार केला. समर्थांमुळे त्यांना गुणही आला. राजेराय हे सहा लाखाच्या जहागिरीचे मालक होते म्हणजे चांगलेच श्रीमंत होते. त्यामुळे त्यांनी गुण आल्यास महाराजांना दहा हजार रुपये अर्पण करण्याचे कबूल करून त्यानुसार दहा हजार रुपये अर्पण केले. पण, महाराज म्हणाले, "मला संन्याशाला काय करायचे आहेत रुपये?' त्यामुळे याच पैशात गावाबाहेरच्या राममंदिराजवळ चांगला चुनेगच्ची मठ महाराजांच्या आज्ञेनुसार बांधण्यात आला. इ. स. 1877 च्या मार्च महिन्यात मठ बांधून पूर्ण झाला. या मंदिरात समर्थांनी स्वतः आपल्या पायांच्या खुणा उमटवून वेगळ्याच प्रकारच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मठात रामदास बुवा हे रहात असत. नंतर म्हैसकर यांनी पुजारी म्हणून काम पाहिले. नंतर श्रीनृसिंहाचारी यांच्या ताब्यात तो गेला. नंतर बराच काळ या मठाकडे दुर्लक्ष झाले होते पण 1953 साली बेलेनाथ महाराजांनी त्यास ऊर्जितावस्था आणली. तिथे आता चांगले कार्यक्रम केले जात असतात. 1996 साली या मठात समर्थांची पंचधातूची मूर्ती बसविण्यात आली आहे. आता या मठाचा कारभार विश्र्वस्तांकडे आहे. भक्तांनी दिलेल्या देणग्यांतून मठाचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे. सभामंडप, गर्भगृह व भक्तांना राहण्यासाठी खोल्या असे बांधकाम झाले आहे. या मठाला आता 125 वर्षे झाली आहेत.

श्रीस्वामींच्या चरणकमलांची ग्वाही देणारा जोशीबुवा मठ :

अक्कलकोट येथे गोपाळराव जोशी नावाचे गृहस्थ होते. ते तसे महाराजांचे निकटचे शिष्य वगैरे काही नव्हते. त्यांच्या घरी "पंचदशी' नावाचा ग्रंथ नित्य वाचला जात असे. एके दिवशी त्यांना या ग्रंथातल्या एका श्र्लोकाचा अर्थ काही लागेना. तेव्हा त्याचा अर्थ विचारण्यासाठी ते व त्यांचे बंधू महाराजांकडे गेले. महाराजांकडे जाऊन ते अजून टेकलेही नसतील तोच महाराजांनी त्याला अडलेला श्र्लोकही ओळखला व त्याचा अर्थही सांगितला. श्र्लोक न सांगताच स्वामींनी ओळखला यामुळे त्यांच्या अगाध सामर्थ्याचा गोपाळराव जोशी यांना प्रत्यय आला व ते स्वामी समर्थांचे अनन्य शिष्य झाले. ते दररोज स्वामींच्या दर्शनाला यायला लागले व चार चार तास त्यांच्या सान्निध्यात बसायला लागले. जोशी यांच्या घराच्या जवळच एक पडकी जागा होती. त्या जागेत औदुंबराचे एक झाड आलेले होते व शेजारी एक आडही होते. स्वामी समर्थ तिथे कधी कधी येऊन बसत. त्यामुळे या जागेत एखादा मठ बांधावा व पादुकांची स्थापना करून पूजेची व्यवस्था करावी असा विचार काही मंडळींच्या मनात आला. गोपाळराव जोशी यांनाही ही कल्पना चांगली वाटली. महाराजांनी ही गोष्ट ऐकली व तिला होकार दिला पण, गोपाळराव जोशी पडले गरीब. ते म्हणाले, "महाराज, मी तर पडलो गरीब. मठासाठी पैसे कोठून आणू?' त्यावर महाराज म्हणाले, "भिक्षा मागून पैसे मिळविले तर मिळतील.' मग जोशी जवळपासच्या गावात फिरले. त्यांना चार-पाचशे रुपये मिळाले. त्यांनी मग अक्कलकोट शहरात काही वर्गणी जमा केली. यातून मठ बांधण्यात आला. अक्कलकोटच्या कुंभार गल्लीत हा मठ आहे. महाराजांच्या हयातीतच हा मठ बांधून पूर्ण झाला. मठ बांधण्याचा मुहूर्त करताना महाराज स्वतः आशीर्वाद देऊन गेले. मठात पादुकांची व श्रीविष्णुपंचायतनाची स्थापना करण्यात आली. मात्र हे सर्व झाले तरी सभामंडपाचे काम बाकी होते. विनायक वासुदेव हे स्वामींचे शिष्य वारंवार अक्कलकोटला येत असत. त्यांनी मग आठ हजार रुपये खर्च करून सभामंडप बांधून घेतला. हाच तो जोशीबुवांचा मठ.

समर्थांचे सोलापूरचे शिष्य, नंतर अक्कलकोटला स्थायिक झालेले चिंतोपंत टोळ हे समर्थांच्या चरणांशी तुळशी वाहून पूजा करीत असत. त्या निमित्ताने महाराज टोळांच्या घरी कधी कधी येत असत. एके दिवशी स्वामी त्यांच्या घरी आले असता टोळांनी त्यांची यथासांग पूजा केली व त्यांच्याजवळ अशी इच्छा व्यक्त केली की, स्वामींचे चरण कायमचे आपल्या सन्निध राहिले तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांनी ही इच्छा व्यक्त केली तेव्हा स्वामी एका पाटावर उभे होते. टोळांची इच्छा ऐकताच महाराज म्हणाले, "ठीक आहे. तुझ्या मनाप्रमाणे होईल.' हे उद्‌गार काढताच महाराज ज्या पाटावर उभे होते त्या पाटावरून खाली उतरले व निघून गेले. गेल्यानंतर टोळ पाहतात तर काय? पाटावर स्वामींच्या दोन्ही पायांचे पिवळसर ठसे उमटले होते. हा चमत्कार पाहून टोळांना आनंद झाला. ही पदचिन्हे असलेला पाट घरात ठेवून ते त्यावरील चरणांची रोज पूजा करायला लागले. पुढे हा पाट या जोशीबुवा मठात ठेवण्यात आला. अनेक भाविक मठात जाऊन त्या पाटाचे व त्यावरील पादुकांचे दर्शन घेतात. या मठाचा जीर्णोद्धार श्रीकांतजी महाराज राजीमवाले यांनी केला आहे.

श्रीस्वामी शिष्य बाळप्पा स्थापित मठ श्री गुरू मंदिर :

बाळप्पा महाराज हे समर्थांचे एकमेव असे दीक्षा दिलेले शिष्य होते. समर्थांनी स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून साधना करून घेतलेली होती. समर्थांनी आपल्या हातातली "श्रीस्वामी समर्थ' अशी अक्षरे कोरलेली अंगठी त्यांच्या हाती दिली होती. आपल्या गळ्यातला रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घालून, माझा शिक्का आता यावच्चंद्रदिवाकरौ तू चालव, असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते कार्य करू लागले व भक्तांनीही त्यांना महाराजांचे वारस मानले. अक्कलकोटच्या संस्थानिकांनी त्यांना 1901 साली शहराच्या भारत गल्ली भागात मठ बांधण्यासाठी जागा दिली. नंतर या मठाच्या मागील बाजूस एक इमारतही बांधून दिली. मुंबईचे सर चिमणलाल सेटलवाड यांना एकदा महाराजांनी दृष्टांत दिला व त्यांना मठाचा गाभारा बांधून देण्याचा आदेश दिला. त्यानुसार मुंबईचे कारागीर आणून त्यांनी मठाचे बांधकाम पूर्ण करून दिले. 1906 साली हे काम पूर्ण झाले.

यानंतर बाळप्पा महाराजांनी संन्यास घेऊन श्रीब्रह्मानंद स्वामी असे नाव धारण केले. मठाच्या मंडपाचे काम राहिले होते. मूर्तिजापूरचे नारायणराव जमादार यांनी हे काम केले. हे काम जारी असतानाच बाळप्पा महाराजांचे 15 मार्च 1910 रोजी निर्वाण झाले तरीही हे काम पूर्ण झाले. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी समर्थांच्याच आज्ञेवरून हा मठ स्थान करण्यात आला होता त्यामुळे या मठास लोक बाळप्पा महाराज मठ असे म्हणायला लागले.

स्वामींनी बाळप्पा महाराजांना दिलेली माळ, एकाक्ष रुद्राक्ष, दंड, छाटी या सर्व वस्तू या मठात आजही जतन केलेल्या आहेत. याच मठाला गुरू मंदिरही म्हणतात. बाळप्पा महाराजांनी आपल्या हयातीतच विदर्भातील गंगाधर शिंगवेकर यांना आपला उत्तराधिकारी नेमले होते. तेच पुढे गंगाधर महाराज म्हणून ओळखले जातात. त्यांनी मठाचे बांधकाम पूर्णत्वाला नेऊन तिथे दर्शनी भागात बाळप्पा महाराजांची समाधीही बांधली आहे. याच गंगाधर महाराजांनी परप्रांतातही भ्रमण करून स्वामी समर्थांचा संप्रदाय बराच वाढवील.

अग्निहोत्राने पवित्र झालेला परिसर श्री क्षेत्र शिवपुरी :

तीर्थक्षेत्र नगरीतील वटवृक्ष मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर, स्टेशनवरील हे स्थान शिवदर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा परिसर सर्वात रमणीय, प्रेक्षणीय, शांतिपूर्ण व पवित्र आहे. गंगाधर महाराजांनी अक्षरशः प्रचंड कार्य उभे केले. मात्र, त्यांना आपल्या अवतार कार्याच्या अंताची जाणीव होताच त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून श्रीगजानन महाराज यांची नियुक्ती केली. ते कडक तपाचरणी होते. त्यांना प्रत्यक्ष श्रीभगवान भार्गवरामाने श्रीविद्येची दीक्षा दिली होती व त्यांना श्रुती पुनरुज्जीवनाची गुरुदक्षिणा अपेक्षित होती. त्यामुळे गजानन महाराजांनी आपल्या जीवनात श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन अशी प्रतिज्ञा केली होती. वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार सर्वांना आहे व तो आपण प्रस्थापित करू, असा त्यांनी पण केला होता. त्यानुसार त्यांनी मोठे कार्य केले. आपल्या कार्याचे केन्द्र म्हणून त्यांनी अक्कलकोटपासून तीन कि.मी. अंतरावर "शिवपुरी' स्थापन केली.

यज्ञयागाविषयीचे अनेक उपक्रम राबविल्यामुळे शिवपुरी ही यज्ञभूमीच ठरली आहे. शिवपुरीतल्या शिवमंदिरात गजानन महाराजांचे जनकपिता स्वामी शिवानंद यांची समाधी आहे. गजानन महाराजांनी पूर्णपणे सात्त्विक, शास्त्रशुद्ध व अहिंसक असा सोमयाग या शिवपुरीत केला होता. या सोमयागाची आठवण देणारा मोठा स्तंभ तिथे उभारण्यात आलेला आहे. शिवाय या यागासाठीच्या यज्ञवेदीचेही जतन करण्यात आलेले आहे. वेदांतल्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या "इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्सेस' या संस्थेचे कार्यालयही या परिसरात आहे. महाराजांनी आपल्या पितामहांच्या स्मरणार्थ तिथेच धर्मात्मा आयुर्वेद रसशाळा स्थापन केली असून आपल्या मातोश्री सोनामाता यांचेही स्मारक स्मृतिमंदिराच्या स्वरूपात उभे केले आहे.

श्रीगजानन महाराजांनी अग्निहोत्र विधीचा प्रचार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रचार कार्यात महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर परदेशांतीलही अनेक मान्यवर प्रत्यक्षात सहभागी झाले. वाढत्या प्रदूषणाच्या काळात या विधीचे महत्त्व सुशिक्षित मंडळींनाही जाणवले असल्याने दररोज आपल्या घरात सूर्योदयाला व सूर्यास्ताला न चुकता अग्निहोत्र करणाऱ्यांची संख्या देशात वाढत चालली आहे.

आजही याचे श्रेय गजानन महाराजांना प्रामुख्याने आहे. श्रीगजानन महाराजांनी वेद, आयुर्वेद, अग्निहोत्र अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय कार्य करून 6 डिसेंबर 1987 रोजी समाधी घेतली. त्यांनी निर्माण केलेल्या परंपरा व अग्निहोत्र हे आजही या संस्थेत चालू आहेत.

श्रीकांतजी महाराज राजीमवाले यांच्या आधिपत्याखाली शिवक्षेत्र न्यास, शिवदर्शन, शिवपुरी विकास ट्रस्ट, तात्याजी महाराज राजीमवाले मेमोरियल ट्रस्ट, चित्रामाता अन्नपूर्णा समिती अशा अनेक संस्था कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून इथल्या समितीच्या वतीने दररोज भक्तांना प्रसाद भोजन, निवास तसेच पंचकर्म उपचार करून आयुर्वेदिक औषधेही दिली जातात.