Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Swami History


अक्कलकोटकर श्रीस्वामी समर्थ महाराज ...
अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे.
श्रीस्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे.
स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज सव्वाशेहून अधिक वर्षे उलटून गेली; परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे.
या "सगुण ब्रह्मा'ची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन्‌ भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे आणि...
त्यांच्या अस्तित्वाचे अन्‌ कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत.
भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट; परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात.
संपूर्ण विश्र्वाच्या आणि मानववंशाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी भगवंत भूतलावर अवतार धारण करीत असतो.
श्रीस्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार?
"प्रत्यक्ष ज्ञानेश्र्वर विभूती। जगामाजी प्रकटली।।' असे ज्यांचे माहात्म्य, त्या संतश्रेष्ठ श्रीगुलाबराव महाराजांनाही
स्वामी समर्थांचा अपूर्व महिमा कसा वर्णावा असा जणू प्रश्र्न पडला...
आणि म्हणूनच आपल्या "सूक्त रत्नावली' या भावमधुर काव्यात ते लिहितात -
अक्कलकोट ग्राम कलियुगी काशी। जिवंत कैलासी लोक सारे।। स्वामी विश्र्वेश्र्वर दत्तात्रेय रूप। महिमा अपूर्व वर्णवेना।।

स्वामी समर्थ या नावाने सर्वसामान्य जनतेला परिचित असलेल्या कलियुगातील लोकोत्तर अवतारी पुरुषाचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदयी नित्य वास करावा अशी तीव्र इच्छा गुलाबराव महाराजांसारख्या संतश्रेष्ठाला झाली असल्यास नवल नाही. म्हणूनच ते श्रीस्वामी समर्थांची पुढील शब्दांत प्रार्थना करतात - देवा दीन मी पदरी धरा।।धृ।। कलियुगी श्रीदत्तात्रेय अवतार तुमचा खरा।।देवा।। अक्कलकोट निवासी ब्रह्म। सगुण हृदयी उतरा।।देवा।। श्रीज्ञानेश्र्वर रूप धरूनी। शिरी ठेवा स्वकरा।।देवा।। अशा प्रकारे श्रीस्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे नवे पैलू आपल्या लक्षात येतात आणि खरोखरच मती कुंठित होऊन जाते! सूर्याचे किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची जशी मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे या प्रज्ञापुरीच्या सूर्याच्या चरित्राचा थांगच लागत नाही! वारुळातून प्रकटलेली दिव्य मूर्ती...

श्रीस्वामी समर्थांच्या जन्माविषयी त्यांच्या भक्तात आणि चरित्रकारात एकवाक्यता आढळत नाही. श्रींचे परमभक्त हरिभाऊ ऊर्फ स्वामीसुत यांच्या मते मध्य हिंदुस्थानातील छेलीखेडा या गावी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 या दिवशी श्रीस्वामी एका अष्टवर्षीय बालकाच्या रूपात प्रकट झाले. तथापि बहुसंख्य चरित्रकारांचे असे मत दिसते की, श्रीस्वामी समर्थ म्हणजे "गुरुचरित्रा'त वर्णन केलेले नृसिंह सरस्वतीच होत. श्रीशैल्य यात्रेच्या निमित्ताने भगवान्‌ श्रीनृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले. नंतर याच कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात वाल्मिकीप्रमाणेच मुंग्यांनी त्यांच्या दिव्य शरीराभोवती आपले प्रचंड वारूळ निर्माण केले. योगायोगाने त्याचवेळी एक लाकुडतोड्या तेथे आला. एका झाडाची फांदी तोडता तोडता त्याच्या धारदार कुऱ्हाडीचा एक ओझरता घाव त्या वारुळावर पडला आणि... भगवान श्रीनृसिंह सरस्वतींची प्रगाढ समाधी भंग

पावली!

अशा प्रकारे समाधी विसर्जित केल्यावर "वृद्ध नृसिंह सरस्वती' म्हणजेच श्रीस्वामी समर्थ कर्दळीवनातून निघून अनेक गावे आणि तीर्थक्षेत्रे पाहता पाहता इ. स. 1856-57 च्या सुमारास अक्कलकोट येथे आले. कर्दळी वनात त्यांच्या मांडीवर जो कुऱ्हाडीचा घाव बसला होता तो पुढेही त्यांच्या मांडीवर स्पष्टपणे दृग्गोच्चर होत असे, असे सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या भक्तांनी "त्यांची काया जुनाट होती आणि त्यांचे वय सहज 400 ते 500 वर्षांचे होते.' असेही त्यांचे वर्णन केलेले आढळते. ही गोष्टदेखील वरील तर्काला पुष्टी देणारीच वाटते. कर्दळीवन ते अक्कलकोट...

कर्दळीवनातून बाहेर पडल्यावर श्रीस्वामी समर्थांची दिव्य मूर्ती वाटेतील अनेक रम्य स्थळे, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे पाहता पाहता इ. स. 1857 चे सुमारास अक्कलकोट येथे आली. या प्रवासाची हकिकत एकदा स्वामी समर्थांनी देखील स्वमुखाने सांगितली हाती, ती अशी -

एकदा कलकत्त्याच्या एका पारशी गृहस्थाने स्वामींना विचारले, "स्वामीन्‌ आपण कोठून आलात?'

त्यावर स्वामी समर्थ लागलीच म्हणाले - "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्र्वर पाहिले.' (यानंतर त्यांनी अनेक गावांची व तीर्थांची नावे पटापट सांगितली. ती सर्वच लक्षात ठेवणे कोणालाच शक्य झाले नाही.) श्रीसमर्थ पुढे म्हणाले, "नंतर आम्ही गोदातटाकास आलो. तेथे बरीच वर्षे राहून नंतर पंढरपूर, बेगमपूर येथे जाऊन हिंडत हिंडत मोहोळास आलो, तेथून सोलापुरी आलो, तेथे काही काळ राहून अक्कलकोटास आलो, तो येथेच आहे.' या यादीवरून "श्रीं'चा संचार आसेतुहिमाचल झाल्याचे लक्षात येते. त्यांच्या हिमालयाच्या वास्तव्यात त्यांनी एका चिनी दांपत्याचे गर्वहरण केले. एका हरिणीच्या निष्पाप पाडसाचे पारध्यापासून रक्षण केले. त्याचप्रमाणे एका तपोनिष्ठ संन्याशास दत्तरूपात दर्शनही दिले. हिमालयाप्रमाणेच जगन्नाथपुरीसही त्यांचे काही काळ वास्तव्य झाल्याचा उल्लेख त्यांच्या दिव्य चरित्रात आढळतो. त्या ठिकाणी अलवणीबुवा नावाचे एक थोर संन्यासी होते. ते तिघांना बरोबर घेऊन जगन्नाथाच्या दर्शनासाठी आले होते; परंतु तेथे येताच ते चौघेही तापाने फणफणून गेले. त्यांचा ताप इतका वाढला की अन्नपाण्यासाठी चार पावले बाहेर जाणेही त्यांना अशक्य होऊन बसले. तेथे आलेल्या हजारो यात्रेकरूंपैकी कुणीही त्यांची विचारपूस केली नाही. अखेर भगवंताला शरण जाऊन बुवांनी त्यांचे अखंड नामस्मरण सुरू केले आणि थोड्याच वेळात एक विलक्षण चमत्कार घडला. लखकन्‌ वीज चमकावी तसा भास बुवांना झाला आणि त्या तेजस्वी प्रकाशलोळातून श्रीस्वामी समर्थांची आजानुबाहू दिव्य मूर्ती एकाएकी त्या ठिकाणी प्रकट झाली.

हिऱ्यांप्रमाणे तेजस्वी असलेल्या त्यांच्या नेत्रात चांदण्याची सुखद शीतलता होती. त्यांनी प्रसन्न मुद्रेने बुवांकडे पाहिले. त्या अमृतदृष्टीने बुवांना न्हाऊन टाकले. "श्रीं' च्या प्रसन्न दर्शनाने बुवांच्या निःस्तेज शरीरात एकाएकी चैतन्य संचारले आणि त्यांनी गीर्वाण भाषेत श्रीगुरूंची स्तुती करून आपण कोण व कोठून आलात असा प्रश्र्न त्यांना केला. त्यावर परमहंस दत्तावधूत प्रसन्न हास्य करीत म्हणाले, "अरे, आमचा वास अखण्ड विश्र्वात आहे; तथापि सह्याद्री, गिरनार, काशी, मातापूर, करवीर, पांचाळेश्र्वर, औदुंबर, कारंजा, नृसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत.' त्याचवेळी आणखी एक चमत्कार घडला. शेजारीच असलेल्या एका टुमदार घरातून पंचपक्वान्नांचा खमंग वास येऊ लागला आणि श्रीसमर्थांनी त्या चौघांना त्या ठिकाणी भोजनाला येण्यासाठी पाचारण केले. तेथील राजेशाही थाट पाहून त्या चौघांनाही यतिरायांच्या विलक्षण लीलेचे अपार कौतुक वाटले आणि त्यांनी आकंठ भोजन करून तृप्तीची ढेकर दिली.

हे अलवणीबुवा नंतर बडोद्यास गेले. तेथे ते बालोन्मत्त पिशाच्चवृत्तीने राहात. तथापि त्यांनी बडोद्यास अनेक लोक-कल्याणाची कामेही केली.

अशा प्रकारे कर्दळीवन ते अक्कलकोट या भ्रमंतीत श्रीस्वामी समर्थांचा वास अनेक तीर्थक्षेत्री झाला; परंतु प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात होते. कुठे ते चंचलभारती म्हणून प्रसिद्ध होते, तर कुठे चैतन्य नृसिंह सरस्वती या नावाने लोक त्यांना ओळखत. मंगळवेढ्यास ते दिगंबरबुवा म्हणून ओळखले जात. अक्कलकोटला आल्यावर मात्र ते अक्कलकोटचे स्वामीमहाराज या नावानेच प्रसिद्धीस आले आणि त्यांची कीर्ती दशदिशांत पसरली.

हम किसीके ताबेदार नही... नाना तीर्थक्षेत्री भ्रमण केल्यानंतर स्वामी समर्थांची स्वारी इ. स. 1857 च्या सुमारास अक्कलकोटास आली. त्यांना अक्कलकोटास आणण्याचे श्रेय त्यांचे परमभक्त चिंतोपंत टोळ यांना दिले पाहिजे. श्रीस्वामी समर्थांना घोड्यावर बसवून चिंतोपंत टोळ अक्कलकोटकडे निघाले; परंतु वाटेतच "उभ्या उभ्या भेटून जा' असा सोलापूरच्या कलेक्टर साहेबांचा तातडीचा हुकूम आल्यामुळे टोळांनी स्वामीमहाराजांना एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांती घेण्याची विनंती केली आणि त्यांच्या दिमतीला एक नोकर देऊन ते तातडीने सोलापुरास निघाले. काम आटोपून त्यांनी पुन्हा घोड्यावर टांग मारली आणि घोडा त्या घनदाट वृक्षाच्या दिशेने भरधाव सोडला. थोड्याच वेळात ते त्या वृक्षाजवळ आले; परंतु "श्रीं'ची दिव्य मूर्ती त्यांना कोठेच आढळली नाही. त्यामुळे त्यांनी नोकरास हाक मारून त्याविषयी विचारले. तेव्हा नोकर थरथर कापत म्हणाला, "साहेब, स्वामींनी जाऊ नये म्हणून मी त्यांची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु "हम किसीके ताबेदार नही' असे उत्तर देऊन ते पाच-दहा पावले पुढे गेले आणि एकाएकी दिसेनासे झाले!' खंडोबाच्या देवळात...

तो वृत्तांत ऐकून हाती आलेले परम निधान गमावल्याचे दुःख होऊन चिंतोपंत टोळ उद्विग्न चित्ताने अक्कलकोटकडे निघाले. स्वामीदर्शनासाठी त्यांचा जीव आसुसला होता. इकडे स्वामी समर्थ त्या घनदाट वृक्षांजवळून अंतर्धान पावून मनोवेगाने निघाले ते थेट अक्कलकोटजवळील खंडोबाच्या देवळात प्रकट झाले. तो दिवस होता आश्विन शुद्ध पंचमी, शके 1779 (बुधवार). बऱ्याच वेळाने चिंतोपंतही तेथे येऊन पोचले. त्या ठिकाणी यतिरायांची मनोहर मूर्ती बालक्रीडा करीत बसलेली पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आले आणि त्यांनी "श्रीं'च्या कुसुमकोमल चरणांवर वारंवार मस्तक टेकवून त्यांना आपल्या घरी चलण्याची विनंती केली; परंतु श्रीसमर्थ ताडकन म्हणाले, "आमचे घर वेगळे आहे.' अखेर नाइलाज होऊन टोळ तिथून निघून गेले. त्यानंतर "श्रीं'ची स्वारी गाववेशीजवळ आली. तेथे तीन दिवस ते निराहार राहिले. अक्कलकोटातील पहिला चमत्कार...

चौथ्या दिवशी तेथील अहमदअली खॉं नामक रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. "श्रीं'ची बालोन्मत्त पिशाचवत्‌ वृत्ती पाहून हे कुणी वेडे इसम असावेत असा तर्क करून त्यांची चेष्टा करण्यासाठी त्याने एका रिकाम्या चिलमीत विस्तव घालून ती चिलीम "स्वामीं' पुढे धरली. तेव्हा स्वामी समर्थांनी काही न बोलता ती निमूट हाती घेतली आणि मोठ्या आनंदाने ओढावयास सुरुवात केली. त्याबरोबर त्या चिलमीतून गांजाचा काळानिळा धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली! तो विलक्षण प्रकार पाहताच खॉंसाहेब मटकन खालीच बसले. हा कुणी सामान्य मनुष्य नसून अवलिया असला पाहिजे याबद्दल खात्री पटून त्यांनी त्या अवलियाला मनोमन वंदन केले. चोळप्पा आणि सुंदराबाई...

श्रीस्वामींच्या चरित्रात चोळप्पा व सुंदराबाई या दोघांना विशेष महत्त्व आहे. "श्रीं'चा वास बहुतकाळ चोळप्पाच्या घरीच झाला. चोळप्पावर "श्रीं'चे पुत्रवत्‌ प्रेम होते. समर्थांनी त्यांची हरप्रकारे परीक्षा पाहिली. त्याच्या बायकोला तर त्यांनी नाना प्रकारे त्रास देऊन सळो की पळो करून सोडले. चूल पेटली असता तीत खुशाल पाणी ओतावे, सोवळ्यात स्वयंपाक सुरू असता मुद्दाम ओवळ्याने शिवावे, अशासारखे प्रकार त्यांनी केल्याचे पाहून सुरुवातीला आपला नवरा एका वेड्याच्या आहारी गेला आहे असे त्या माऊलीस वाटल्यावाचून राहिले नसेल! परंतु पुढे प्रसंगाने श्रीस्वामी समर्थांचे सामर्थ्य तिला कळून चुकले, त्यामुळे तिने तो त्रासही नंतर निमूटपणे सहन केला. श्रीसमर्थांची बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती...

स्वामी चरित्रकार कै. भागवत लिहितात ः "महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाच्चवृत्ती म्हणत. प्रातःकाळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रातःस्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांस स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास! महाराजांस जेवण दुसऱ्यानेच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास! महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु ते अंगावर असावे असे त्यांना वाटल्यास! महाराजांनी चाहेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे, महाराज चाहेल त्याच्या हातचे अन्न खात असत, परंतु महाराज अधर्मी आहेत अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन-दोनदा स्नान करीत. केशर-चंदनाची उटी अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ-आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास नकळत एखाद्या बागेत, स्मशानात अगर जंगलात जाऊन राहत.

महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काही तरी बोलत असत. लहान मुलाजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखाद्या वेळी स्वारी रागावली म्हणजे सात-सात दिवस त्यांचा रागच हलू नये. स्वारी आनंदात असली म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे, अशा प्रकारे महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणासच झाली नाही.'

"गुरुलीलामृत'कार वामनबुवा ब्रह्मचारी लिहितात ः "श्रीगुरू चालत असता आपल्याशीच बोलत व हसत. चालताना त्यांना मध्येच गुडगुडी ओढण्याची लहर येई. ते मधूनच झाडांवरून, दगडांवरून प्रेमाने हात फिरवून "तुम्हांला काय हवं?' असा प्रश्र्न करीत. हसताना त्यांचे सर्वांग हलत असे. तोंडातून नित्य वेदमंत्र, दोहे, श्र्लोक व अभंग बाहेर पडत. दुसऱ्याच्या मनातील प्रश्र्न ओळखून त्यांची उत्तरे देण्याचा चाळा तर एकसारखा सुरूच असे.' तर स्वामी बखरकार कै. गोपाळबुवा केळकर आपल्या बखरीत लिहितात ः "श्रीस्वामी समर्थांस झोप लागलेली कोणाच्या पाहण्यात नाही. मात्र डोक्यावर पांघरूण घेऊन पलंगावर निजत असत. पहाटे दोन वाजल्यापासून पांघरुणातून अभंगांची कडवी, श्र्लोक म्हणू लागत. जेणेकरून महाराज आता जागे झाले असे लोकांस वाटे. मग कोणाला काही वेदांत, भक्तियोग, हठयोग, राजयोग इत्यादींचे जे काही प्रश्र्न करण्याचे असतात ते तेव्हा करत. त्या त्या लोकांनी केलेल्या प्रश्र्नांची उत्तरे महाराजांनी सरळ आणि अनुभवासह यथार्थ द्यावी, परंतु ही व्यवस्था कोठपर्यंत? उजाडेपर्यंत! एकदा उजाडले आणि लोकांची गर्दी होऊ लागली, म्हणजे तो सर्व क्रम बदलला, मग काही प्रश्र्न केला, तर त्याला उत्तर बहुतेक करून मिळावयाचे नाही. प्रश्र्न करणाराने प्रश्र्न करावा एक आणि उत्तर मिळावे भलतेच. स्वामी समर्थांची स्वारी सहज बाहेर निघाली म्हणजे सर्व राजचिन्हांनी मंडित दिसावी. छत्रचामरे, पालख्या, मेणे, घोडे, गाड्या, गाई-म्हशींचे खिल्लार, तंबू, कनाती, नगारखाना, वाजंत्री, शिंग, सेवेकऱ्यांची पलटण, पुराणिक, हरदास, गवई, फूलवाले, मिठाईवाले व सर्व प्रकारचे दुकानदार महाराजांबरोबर आहेतच!'

श्रीसमर्थांच्या दर्शनासाठी दररोज शेकड्याने लोक तरी सहज येत व भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटे की, आपणापेक्षा या महापुरुषाला अधिक ज्ञान आहे! श्रीसमर्थांना सोवळ्या-ओवळ्याचा विशेष विधिनिषेध नसे, परंतु कुणी सेवेकरी भलत्याच ठिकाणी नाक शिंकरला किंवा खाकरला तर बिलकूल खपत नसे. हिंदूंप्रमाणेच मुसलमानांवर प्रेम असून त्यामुळेच मंदिरांप्रमाणेच पीर किंवा दर्ग्याच्या ठिकाणीही ते पुष्कळदा जाऊन बसत. जनावरात गाय आणि कुत्रा त्यांना विशेष प्रिय असे. मांजरावर मात्र त्यांचा फार राग असे. फुलात भगव्या रंगाची फुले त्यांना विशेष आवडत, तर खाण्याच्या पदार्थांत बेसनाचे लाडू, पुरणपोळी, कडबोळी आणि कांद्याची भजी त्यांची विशेष आवडती होती. सुंदराबाई त्यांना जेवू घाली त्यावेळी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना भरवावे लागे. त्यांनी जेवावे म्हणून सुंदराबाई नाना प्रकारच्या युक्त्या-प्रयुक्त्या लढवी. ते पुष्कळदा झोपूनच जेवत, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपण्याची त्यांना सवय होती आणि विशेष म्हणजे ते पुष्कळदा खुशाल दक्षिणेकडे पाय करून झोपलेले आढळत!

श्रीसमर्थांचे हे वर्णन वाचल्यावर श्रीमद्‌भागवतात यदुराजाला भेटलेल्या अवधूताची आठवण येते. हा अवधूत सदैव ब्रह्मानंदात डुलणारा आणि आत्मज्ञानाच्या तेजाने तळपणारा होता. सर्वत्र आपणच व्यापलेले आहोत, अशी साम्यता त्यांच्या अंगी बाणलेली होती. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने द्वैतभावना पूर्णपणे जिंकली होती. त्यांचे वागणे एखाद्या निरागस बालकाप्रमाणे होते. अमृताला लाजविणारे आणि ब्रह्मरसाने भरलेले रसाळ भाषण करीत असत. ब्रह्मरस पिऊन मस्त झाल्यामुळे ते कुणालाही जुमानीत नसत. "हम किसीके ताबेदार नही' असे म्हणणारे श्रीसमर्थ सुंदराबाईंच्या मात्र अर्ध्या वचनात राहिले, हे पाहिल्यावर या बाईंची पूर्वपुण्याई फारच जबरदस्त असली पाहिजे असे म्हणावे लागेल; मात्र "श्रीं'ची सेवा तिने लोभबुद्धीने केली. श्रींवरील आपल्या प्रभावाचा उपयोग करून तिने बराच पैसा गाठी बांधला; परंतु पुण्याई संपल्यावर तिलाही "श्रीं'च्या सेवेतून मुक्त व्हावे लागले. धनप्राप्तीपेक्षा आत्मप्राप्तीसाठी तिने श्रीसमर्थांचा उपयोग करून घेतला असता, तर तिच्या आयुष्याचे सोने झाले असते; परंतु क्षणिक मोहात गुंतलेल्या जिवाला एवढा सारासार विचार राहात नाही हेच खरे! "श्रीं'चे रूपवर्णन...

श्रीस्वामी समर्थ प्रत्यक्ष कसे दिसत, कसे बोलत, कसे चालत याबद्दल वाचकांना कुतूहल असणे स्वाभाविक असल्याने आपण "श्रीं'च्या रूपवर्णनाकडे वळू. श्रीस्वामी समर्थांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते दाशरथी रामाप्रमाणे आजानुबाहू होते. त्यांची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती. विशाल उदर, रुंद खांदे, तीक्ष्ण भेदक नजर आणि पांढऱ्याशुभ्र भुवया ही त्यांची आणखी काही वैशिष्ट्ये. "श्रीं'चा वर्ण गव्हाळ असून, कांती इतकी तेजस्वी होती की त्यांच्याकडे एकसारखे टक लावून पाहणे देखील शक्य होत नसे. त्यांच्या तीक्ष्ण नजरेत विलक्षण जरब होती. त्यांचा रागही असा भयंकर की, एकदा विश्र्वासराव मान्यांसारखे शूर सरदार म्हणाले की, "प्रसंग पडल्यास आम्ही वाघाच्या अंगावर चालून जाण्यास भिणार नाही, परंतु श्रीसमर्थांपुढे उभे राहण्यासही आम्हांस धैर्य होत नाही, ते रागावल्यावर जाळून भस्मच करतील, असे भय वाटते...!'

"श्रीं'चे कर्ण मंगलमूर्तींप्रमाणे मोठे असून, त्यांची नाजूक पाळी "श्रीं'च्या प्रत्येक हालचालींबरोबर मागे-पुढे हलत असत. हसताना पोट धरून हसण्याची सवय असून, बोलणे अल्प असे. बोलणे बहुधा मराठी किंवा हिंदीतून होई. त्यांची काया जुनाट वाटत असली तरी उत्साह तरुणाला लाजविणारा असा होता. त्यांचे एकंदर शरीर गुलाबपुष्पाप्रमाणे सुकोमल असून त्यांच्या पायास हात लावल्यावर असे वाटे की, यांच्या पावलास हाडे मुळीच नसावीत. त्यांच्या कपाळी चंदनाचा भव्य टिळा, गळ्यात तुळशी वा रुद्राक्ष यांच्या माळा असत. त्यांचे सेवेकरी त्यांना कौपीन नेसवीत. डोक्यावर जरीची कानटोपी घालीत आणि अंगावर शाल पांघरीत; परंतु कोणत्या क्षणी स्वामी महाराज या सर्व वस्तू फेकून देऊन दिगंबर बनतील याचा नेम नसे. असा हा अवधूत श्रीसमर्थांच्या रूपात जणू पुन्हा एकदा भूतलावर प्रकटला होता की काय कुणास ठाऊक! श्रीसमर्थ कोण होते?...

"मूळ पुरुष-वडाचे झाड-दत्त नगर-मूळ-मूळ' अशा गूढ शब्दांत स्वतःची माहिती सांगणाऱ्या श्रीस्वामी समर्थांचे चरित्र असेच गूढ आणि अतर्क्य घटनांनी ओतप्रोत भरलेले आहे. ते कोण, कोठले, त्यांचे आई-बाप कोण याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. मात्र हा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात काही निकटच्या भक्तांनी करून पाहिला. एकदा चिंतोपंत टोळांच्या घरी स्वामी समर्थांचा मुक्काम असताना "श्रीं'ची स्वारी घराबाहेरील अंगणात बिछान्यावर पहुडली होती. मंडळींशी गप्पा सुरू होत्या. त्या नादात मध्यरात्र केव्हा झाली हे कुणालाच समजले नाही. तेवढ्यात श्रीसमर्थांनी खड्या आवाजात एक जुनी लावणी चालीवर म्हणावयास सुरुवात केली - गोरे ग रूप तुझे। तुला पाहिले। सात ताल माडीवरी।।

"श्रीं'च्या तोंडी ही शृंगारिक लावणी पाहून सर्वांनाच मोठे आश्र्चर्य वाटले. तेवढ्यात चिंतोपंतांनी थोडे धाडस करून विचारले, "महाराज, आपण पूर्वाश्रमी गृहस्थ होता असे वाटते. आपण आपली जात कोणती हे कृपा करून सांगाल का?' त्यावर श्रीसमर्थ चटकन म्हणाले, "आमची जात चांभार, आई महारीण आणि बाप महार.' एवढे सांगून ते पोट धरधरून खो-खो हसत सुटले. पुढे मात्र एकदा कर्वे नावाच्या एका गृहस्थांनी या संदर्भात खुलासेवार सांगण्याची विनंती केल्यावर दत्तावधूत यतिराज त्यांना म्हणाले - "आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह, काश्य गोत्र, आमची मीन राशी, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस.' स्वामी समर्थांची जी पत्रिका नाना रेखी यांनी तयार केली तिला स्वामी समर्थांनी मान्यता दिली होती, त्या पत्रिकेवरही "नृसिंहभान' असेच टोपण नाव आढळते; मात्र श्रीसमर्थांनी आपली राशी मीन असे का सांगितले याचे कोडे उलगडत नाही. वास्तविक त्यांचे जन्म लग्न मीन आहे. त्यामुळे त्यांना आपली लग्नराशी अभिप्रेत असावी असे वाटते. कारण सदर पत्रिकेत त्यांची चंद्रराशी मेष दाखविली आहे. तसेच, सदर पत्रिकेत यजुर्वेदी ब्राह्मण, कश्यप गोत्र असेच लिहिले आहे. (ही पत्रिका पाहिल्यावर "नौबत बजाव' असे शब्द श्रीमुखातून बाहेर पडले व दक्षिणा म्हणून श्रीसमर्थांनी नानाजींच्या उजव्या हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. त्याच वेळी त्यांच्या हातावर नीलवर्णाचे लहानसे विष्णुपाद उमटले. ते मरेपर्यंत त्यांच्या हातावर होते असे म्हणतात.)

श्रीसमर्थ हे खरे तर जगद्‌गुरू होते. जात-पात-धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी विश्र्वोद्धाराचे कार्य केले. तथापि त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे आणि गीतेतील बरेच संस्कृत श्र्लोक नित्य असत. त्यावरून ते ब्राह्मण असावेत, असा त्यांच्या भक्तांचा तर्क असून, श्रीनृसिंह सरस्वती म्हणजेच श्रीस्वामी समर्थ ही गोष्ट ओघानेच मान्य करावी लागते; मात्र माझी जात चांभार, बाप महार आणि आई महारीण असे सांगून श्रीसमर्थांनी जातिभेदाच्या संकुचित कल्पनांमध्ये अडकलेल्या लोकांना चांगलाच धडा शिकविला आहे, असा निष्कर्ष काढल्यास तोही चुकीचा ठरू नये. तेजस्वी शिष्यपरंपरा...

श्रीस्वामी समर्थांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक तेजस्वी पैलू आहेत. त्यात त्यांनी निर्माण केलेली तेजस्वी शिष्यपरंपरा हा पैलू तर विशेषच तेजस्वी आहे. त्यांनी गुरुपदेश मागणाऱ्या ठाकूरदासबुवांना उद्देशून "हमकू कायकू सताता, हम पंतोजीपण नही करता, नाटके गुरु, बाटके चेले हम करते नहीं' असे उद्‌गार काढले असले तरी केवळ दृष्टिक्षेपात संकल्पदीक्षा देऊन त्यांनी गतजन्मीच्या अनेक योगभ्रष्टांना मार्गास लावले ही वस्तुस्थिती आहे. अशी "संकल्प दीक्षा' देणारे सद्‌गुरू या भूतलावर क्वचितच कुठे निर्माण होतात. कोणताही विधी न करता, स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे, जीवन्मुक्त करणे या दिक्षाप्रकाराला "संकल्प दीक्षा' असे म्हणतात. संकल्प देव तू (ब्रह्मसूत्र 4.4.8) या दीक्षेच्या द्वारे त्यांनी अगदी सामान्यातल्या सामान्य अशा एका मुसलमान भक्ताला त्याच्या सेवेवर संतुष्ट होऊन महान अवलिया बनविले. इतर गुरूंप्रमाणे दीक्षा देण्याचा एखादा "विधी' श्रीसमर्थांनी कधी केला असेल असे वाटत नाही; परंतु केवळ दृष्टिकटाक्ष टाकून संकल्पानेच त्यांनी योग्य त्या व्यक्तींना दिशा दिली आणि पाहता पाहता लोहाचे बावनकशी सुवर्ण बनले! या शिष्यांचे धगधगीत वैराग्य, खडतर तपश्र्चर्या, अपार गुरुभक्ती, उज्ज्वल चारित्र्य, लोकविलक्षण त्याग, ज्वलंत निष्ठा इत्यादी गोष्टी खरोखरच आदर्श होत्या. एका दीपाने हजारो दीप प्रज्वलित व्हावेत त्याप्रमाणे समर्थरूपी ज्ञानदीपाने अनेकांच्या हृदयातील आत्मज्ञानरूपी दीप प्रज्वलित करून त्यांच्या मानवजन्माचे सार्थक केले. एवढेच नव्हे तर ती शिष्यपरंपरा पुढेही चालत राहून हजारो मुमुक्षूंचा त्यायोगे उद्धार झाला आणि अध्यात्मप्रांतात जणू दीपावलीचा थाट उडाला!

या "आदर्श' शिष्यवर्गाची संख्या सहज पंचविसाच्या घरात जाईल. यामध्ये श्रीबीडकर महाराज, श्रीशंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), श्रीनृसिंह सरस्वती (आळंदी), श्रीसीताराम महाराज (मंगळवेढे), श्रीदेवमामलेदार (नाशिक), श्रीरांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), श्रीस्वामीसुत (मुंबई), श्रीबाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि श्रीगजानन महाराज (शेगांव) इत्यादी अनेक नावे सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतील यात तिळमात्र शंका नाही.

अशा प्रकारे श्रीसमर्थांचे खरे अवतारकार्य अक्कलकोट येथेच झाले. या ठिकाणी ते सुमारे एकवीस ते बावीस वर्षे होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. नास्तिकांना चमत्कारांच्या द्वारे ईशशक्तीची जाणीव करून देत ईशसेवेला लावले. दुष्टांना सुष्ट बनविले. ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्र्वरनिष्ठांची ओळख करून दिली. अनेक व्याधिग्रस्तांच्या व्याधी दूर केल्या. अशा प्रकारे जगाची विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सद्‌धर्म, सुसंस्कृती अन्‌ भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठीची अनंत लीला करून श्रीसमर्थांनी आपल्या तेजस्वी अवतारकार्याची सांगता केली. * कै. वि. के. फडके * सौजन्य : श्री. ग. आ. 93