Pls Note : "सर्व स्वामी भक्तांना कळविण्यात येत आहे की गुरुवार दिनांक २६ मार्च २०२० रोजी होणारे प्रकटदिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत...", Pls see Events page for more details

Shri Swami Samarth
Bhakti Mandal Trust

Reg No : E 27264 (mumbai)

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Akkalkot Darshan


Video

श्रीक्षेत्र अक्कलकोट ...

श्रीस्वामी वास्तव्याने पुनित श्री वटवृक्ष देवस्थान :

सध्या ज्या मंदिरात भाविक प्रामुख्याने दर्शनाला येतात ते मंदिर म्हणजे वटवृक्ष मंदिर होय. इथे स्वामी महाराज वडाच्या झाडाखाली अनुष्ठानाला बसत असत. तिथे एक खाऱ्या पाण्याची विहीर होती पण, स्वामींनी तिचे पाणी गोड केले. याच विहिरीतले पाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिळते आहे. स्वामी देह ठेवण्यापूर्वी निरवानिरवीची भाषा बोलायला लागत तेव्हा त्यांचे एक पट्टशिष्य जोतिबा पांडे यांनी त्यांना प्रश्र्न केला. "महाराज, तुम्ही गेल्यावर आम्हांला कोण आहे?' त्यावर महाराज म्हणाले, "तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच मी तुमच्या सन्निध आहे.' तेव्हा या वटवृक्षाजवळच पांडे यांनी 8 बाय 8 फूट या आकाराचे छोटे मंदिर बांधले व तिथे रोजच्या रोज पूजेला ब्राह्मण नेमून दिला. सध्याच्या मंदिरातील गर्भगृह त्यांनीच बांधले आहे. महाराजांचे शिष्य बाळप्पा यांचे उत्तराधिकारी गंगाधर स्वामी यांनी नंतर या परिसरात बांधकामे करवून घेतली. वडाच्या झाडाच्या बुंध्याशी स्वामींच्या पादुका ठेवून त्याच्यावर एक छोटेखानी मंदिर बांधले गेले. या मंदिराला चारी बाजूंनी बंद करण्यात आले असून आत डोके घालून पादुकांवर डोके टेकविता येईल एवढे प्रवेशद्वार ठेवले आहे. यातून डोके आत घालून पादुकांवर ते टेकले की मृदंग दुमदुमल्याचा आवाज येतो. तो कोठून येतो याचा तपास कोणी आजवर केलेला नाही. मात्र या आवाजात कधीही खंड पडलेला नाही. नंतरच्या काळात बांधकामे होत गेली व मंदिरात अनेकानेक सुविधा निर्माण होत गेल्या. महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत पण, कोणाही मोठ्या धनाढ्य दानशूर व्यक्तीने दान दिले नसतानाही केवळ भक्तांच्या मदतीने इतकी उत्तम व्यवस्था करणारे हे राज्यातले एकमेव देवस्थान आहे. वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानात कोणत्याही सुविधेसाठी पैसे आकारले जात नाहीत.

श्रीस्वामी समर्थ महाराज समाधी मठ :

स्वामी समर्थांची समाधी असलेले हे मंदिर आहे. चोळप्पा हे स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थांचे वास्तव्य अक्कलकोटमध्ये 21 वर्षे होते. त्या पूर्वी ते सोलापुरात असताना टोळ यांच्या घरी वास्तव्याला होते. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले त्या दरम्यानच्या काळात टोळ यांनाही अक्कलकोटच्या राजांकडे नोकरी लागली. त्यामुळे त्यांनीही अक्कलकोटला घर केले. स्वाभाविकच महाराजही अक्कलकोटच्या मुक्कामात आपल्याच घरी राहतील असे त्यांना वाटले होते पण महाराजांनी ते नाकारले व ते चोळप्पा यांच्या घरी राहिले. चोळप्पा तसे गरीब होते. महाराज त्यांच्या घरी राहिल्यामुळे त्यांच्यावर ताण यायला लागला पण, स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना काही कमी पडले नाही. स्वामींनी त्यांची निष्ठा अनेकदा तपासून पाहिली पण, चोळप्पा कधीही कमी पडले नाहीत. महाराजांनी त्यांना आपल्या पादुका दिल्या व त्यांची पूजा नित्य नियमाने करण्याची सूचना केली. महाराजांनी देह वटवृक्षाखाली ठेवला असला तरी त्यांनी आपली समाधी बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घरीच बांधावी अशी सूचना आपल्या हयातीतच करून ठेवली होती. त्या जागेचे बांधकामही करून घेतले होते. त्या नुसार त्यांची समाधी तेथे बांधण्यात आली आहे. हाच ताे समाधी मठ होय. येथे स्वामींच्या पादुका व चोळप्पा यांच्या वंशजांचे घर तर आहेच पण, समर्थांच्या आवडत्या गाईचीही समाधी येथे बांधण्यात आली आहे. बुधवार पेठेत श्रीस्वामी समर्थांच्या समाधी मठाच्या मूळ पार्थिव बांधकामावर दक्षिण भारतीय शैलीनुसार मंत्रालय येथील राघवेंद्र स्वामींच्या मठाप्रमाणे राजगोपुरमचे बांधकाम करण्यात आले आहे. गर्भमंदिरावरील इमला पद्धतीच्या बांधकामाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर विविध देवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी समाधी मठावरील बांधकामाची उंची 15 फूट होती ती आता 51 फूट झाली असून रुंदी 21 फूट आहे. नव्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, सदर वास्तूच्या रचनेसाठी दाक्षिणात्य शैलीत निपुण असलेले विश्र्वकर्मा संप्रदायाचे वास्तुशिल्पी व तिरुपती येथील देवस्थानचे वास्तुशिल्पी कै. दक्षिणमूर्ती तेवर शिल्पी यांचे शिष्य श्रीधरन्‌ सन्नाप व श्रीनिवास पांडियन यांनी हे काम पूर्ण केले आहे. तामिळी कलाकारांची कला प्रथमच स्वामींच्या मूळ समाधी मठासाठी वापरण्यात आली आहे.

श्रीस्वामी आज्ञेने स्थापित श्री राजेरायन मठ :

हा मठ अक्कलकोट शहराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या राममंदिराजवळ आहे. हा मठ स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेनेच बांधण्यात आला आहे. हैदराबाद संस्थानातील शंकरराव राजेराय या जहागीरदाराने हा मठ बांधून दिला आहे. शंकरराव राजेराय हे असाध्य व्याधीने त्रस्त होते. त्यांनी अनेक प्रकारचे औषधोपचार केले तरी त्यांना गुण येईना त्यामुळे त्यांनी शेवटी समर्थांच्या कृपादृष्टीचा काही उपयोग होतोय का ते पहावे असा विचार केला. समर्थांमुळे त्यांना गुणही आला. राजेराय हे सहा लाखाच्या जहागिरीचे मालक होते म्हणजे चांगलेच श्रीमंत होते. त्यामुळे त्यांनी गुण आल्यास महाराजांना दहा हजार रुपये अर्पण करण्याचे कबूल करून त्यानुसार दहा हजार रुपये अर्पण केले. पण, महाराज म्हणाले, "मला संन्याशाला काय करायचे आहेत रुपये?' त्यामुळे याच पैशात गावाबाहेरच्या राममंदिराजवळ चांगला चुनेगच्ची मठ महाराजांच्या आज्ञेनुसार बांधण्यात आला. इ. स. 1877 च्या मार्च महिन्यात मठ बांधून पूर्ण झाला. या मंदिरात समर्थांनी स्वतः आपल्या पायांच्या खुणा उमटवून वेगळ्याच प्रकारच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मठात रामदास बुवा हे रहात असत. नंतर म्हैसकर यांनी पुजारी म्हणून काम पाहिले. नंतर श्रीनृसिंहाचारी यांच्या ताब्यात तो गेला. नंतर बराच काळ या मठाकडे दुर्लक्ष झाले होते पण 1953 साली बेलेनाथ महाराजांनी त्यास ऊर्जितावस्था आणली. तिथे आता चांगले कार्यक्रम केले जात असतात. 1996 साली या मठात समर्थांची पंचधातूची मूर्ती बसविण्यात आली आहे. आता या मठाचा कारभार विश्र्वस्तांकडे आहे. भक्तांनी दिलेल्या देणग्यांतून मठाचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे. सभामंडप, गर्भगृह व भक्तांना राहण्यासाठी खोल्या असे बांधकाम झाले आहे. या मठाला आता 125 वर्षे झाली आहेत.

श्रीस्वामींच्या चरणकमलांची ग्वाही देणारा जोशीबुवा मठ :

अक्कलकोट येथे गोपाळराव जोशी नावाचे गृहस्थ होते. ते तसे महाराजांचे निकटचे शिष्य वगैरे काही नव्हते. त्यांच्या घरी "पंचदशी' नावाचा ग्रंथ नित्य वाचला जात असे. एके दिवशी त्यांना या ग्रंथातल्या एका श्र्लोकाचा अर्थ काही लागेना. तेव्हा त्याचा अर्थ विचारण्यासाठी ते व त्यांचे बंधू महाराजांकडे गेले. महाराजांकडे जाऊन ते अजून टेकलेही नसतील तोच महाराजांनी त्याला अडलेला श्र्लोकही ओळखला व त्याचा अर्थही सांगितला. श्र्लोक न सांगताच स्वामींनी ओळखला यामुळे त्यांच्या अगाध सामर्थ्याचा गोपाळराव जोशी यांना प्रत्यय आला व ते स्वामी समर्थांचे अनन्य शिष्य झाले. ते दररोज स्वामींच्या दर्शनाला यायला लागले व चार चार तास त्यांच्या सान्निध्यात बसायला लागले. जोशी यांच्या घराच्या जवळच एक पडकी जागा होती. त्या जागेत औदुंबराचे एक झाड आलेले होते व शेजारी एक आडही होते. स्वामी समर्थ तिथे कधी कधी येऊन बसत. त्यामुळे या जागेत एखादा मठ बांधावा व पादुकांची स्थापना करून पूजेची व्यवस्था करावी असा विचार काही मंडळींच्या मनात आला. गोपाळराव जोशी यांनाही ही कल्पना चांगली वाटली. महाराजांनी ही गोष्ट ऐकली व तिला होकार दिला पण, गोपाळराव जोशी पडले गरीब. ते म्हणाले, "महाराज, मी तर पडलो गरीब. मठासाठी पैसे कोठून आणू?' त्यावर महाराज म्हणाले, "भिक्षा मागून पैसे मिळविले तर मिळतील.' मग जोशी जवळपासच्या गावात फिरले. त्यांना चार-पाचशे रुपये मिळाले. त्यांनी मग अक्कलकोट शहरात काही वर्गणी जमा केली. यातून मठ बांधण्यात आला. अक्कलकोटच्या कुंभार गल्लीत हा मठ आहे. महाराजांच्या हयातीतच हा मठ बांधून पूर्ण झाला. मठ बांधण्याचा मुहूर्त करताना महाराज स्वतः आशीर्वाद देऊन गेले. मठात पादुकांची व श्रीविष्णुपंचायतनाची स्थापना करण्यात आली. मात्र हे सर्व झाले तरी सभामंडपाचे काम बाकी होते. विनायक वासुदेव हे स्वामींचे शिष्य वारंवार अक्कलकोटला येत असत. त्यांनी मग आठ हजार रुपये खर्च करून सभामंडप बांधून घेतला. हाच तो जोशीबुवांचा मठ.

Click Here to Scroll Down