Pls Note : "सर्व स्वामी भक्तांना कळविण्यात येत आहे की गुरुवार दिनांक २६ मार्च २०२० रोजी होणारे प्रकटदिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत...", Pls see Events page for more details

Shri Swami Samarth
Bhakti Mandal Trust

Reg No : E 27264 (mumbai)

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player


Datt Sampraday


Video

श्रीदत्त संप्रदाय


अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा चौथा अवतार म्हणून ओळखले जातात. स्वतः श्रीगुरुदेव दत्त हा त्यातील पहिला अवतार. हा अवतार पुराणकाळात होऊन गेल्याने त्याचा नेमका काळ सांगता येत नाही. दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ (कुरवपूर जि. रायचूर, कर्नाटक), तिसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज (गाणगापूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि चौथा अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ.


श्रीदत्तात्रेयांच्या मूळ अवतार प्राचीन असल्याने त्याचा कालनिर्णय होऊ शकला नाही, मात्र अन्य तीन अवतार अर्वाचीन असल्यामुळे त्यांचा कालखंड उपलब्ध आहे. श्रीपाद श्रीवल्लभ इ. स. 1320 ते 1350 या कालावधीत पृथ्वीतलावर स्थिर होते. श्रीनृसिंह सरस्वती यांचा कालखंड इ. स. 1408 ते 1458 दरम्यानचा आहे तर अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थांचा कालखंड इ. स. 1838 ते 1878 असा आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या जन्माविषयीचा ठावठिकाणा अद्यापही नीटसा लागला नसल्या कारणाने 1838 हे त्यांचे प्रकट होण्याचे वर्ष समजले जाते.


श्रीगुरुदेव दत्त



श्रीदत्त संप्रदायाचे आद्य प्रवर्तक असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या श्रीगुरुदेव दत्तांच्या जन्माबाबत हिंदू धर्मातल्या विविध पुराणांत विविध प्रकारच्या कथा दिलेल्या आहेत. श्रीमद्‌भागवत, ब्रह्मांडपुराण, कुर्मपुराण, महाभारताचे अनुशासन पर्व, ब्रह्मपुराण, अग्निपुराण, विष्णुधर्मोत्तरपुराण, मार्कंडेय पुराण आदी पुराणांमधून श्रीगुरुदेव दत्तात्रेयांच्या जन्माविषयीच्या अनेक कथा पूर्वापार प्रचलित असल्या तरी सर्वसामान्यपणे भविष्यपुराणात आलेली अत्रीऋषी, अनुसूया आणि तीन बालकांची कथा सर्वत्र प्रमाण मानली जाते.


उपनिषदांनी श्रीदत्तात्रेयांना विश्वगुरु असे संबोधले आहे. सदैव भ्रमण करीत राहणे आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर उपाय सुचवून त्यांना अध्यात्ममार्गाकडे आकर्षित करून घेणे हे दत्तात्रेयांच्या सर्वच अवतारांचे वैशिष्ट्य राहिले आहे. या चारही अवतारांनी त्यांच्या कृपेची वृष्टी करताना जातिधर्माचा किंवा वर्णाचा भेद पाळलेला नाही. चारही अवतारांनी संसारीजनांमध्ये वावरताना काहीसे विक्षिप्त व सकृत्‌दर्शनी विसंगत वाटेल असे वर्तन केलेले दिसते, बरेचदा अद्‌भुत वाटावे असेही चमत्कार केल्याचे दिसून येते. श्रीदत्त संप्रदायात दान व त्याग यांना महत्त्व आहे. या संपद्रायाला अवधूत संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते. श्रीदत्त संप्रदायामध्ये पादुकांच्या पूजनाला फार महत्त्व आहे.


श्रीदत्तात्रेयांनी सदैव भ्रमण केले व अतिदुर्गम ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्र्चर्येच्या स्थानांपैकी माऊंट अबू हे राजस्थानातील ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून 5653 फूट उंचावरील गुरू शिखर येथे श्रीदत्तात्रेयांनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. येथे त्यांचा काही काळ निवास होता. येथील वास्तव्य संपविताना श्रीगुरुदत्तात्रेयांनी त्यांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुशिखरावरील या पादुका व त्यावर बांधलेले मंदिर सहा हजार वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते.


अवतार समाप्तीच्या वेळी गुजरात येथील गिरनार पर्वतावर पादुका स्थापन करून श्रीदत्तात्रेय अंतर्धान पावले. हे अतिशय जागृत दत्तस्थान म्हणून ओळखले जाते. पायथ्यापासून 3,666 फूट उंचावर असलेल्या या पर्वताच्या 10,000 पायऱ्या चढून गेल्यावर श्रीदत्तपादुकांचे दर्शन घडते.



श्रीपाद श्रीवल्लभ (कुरवपूर)


इ. स. 1320 ते 1350 या कालावधीमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीगुरू दत्तात्रेयांचा दुसरा अवतार प्रसिद्धीस आला. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या पीठापूरम येथे त्यांचा जन्म झाला. माता सुमती आणि वडील आपळराज हे दांपत्य दत्तभक्त होते. एके दिवशी, घरी श्राद्ध विधी सुरू असतानाच श्रीगुरुदेवदत्त यतिवेषात भिक्षा मागण्यासाठी आले. कार्याचे ब्राह्मण जेवलेले नसतानाही सुमतीने त्या यतीला भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रेयांनी तिला वर दिला. त्यावर सुमतीने, तेजस्वी पुत्र व्हावा असा वर मागितला. त्यावर श्रीदत्तात्रेयांनी मीच तुझ्या पोटी जन्मास येईन, असा वर दिला. हाच दत्तावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ.


श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि बालपण पीठापूरम येथेच गेले. व्रतबंध झाल्यावर त्यांनी आपल्या मातापित्यांकडे जनहितार्थ देशपर्यटनास जाण्याची परवानगी मागितली. जाताना त्यांनी आपण कोण आहोत हे सांगण्यासाठी आईवडिलांना सहा हात व तीन शिरे अशा त्रिगुणात्मक त्रैमूर्त स्वरूपात दर्शन दिले. श्रीपाद श्रीवल्लभांना दोन मोठी भावंडे मात्र ती अपंग होती. यास्तव त्यांच्यावर कृपाकटाक्ष टाकून त्यांनी या भावंडांना सुस्वरूप केले, मात्यापित्यांचा प्रतिपाळ करण्याची सूचना देऊन श्रीपाद श्रीवल्लभ पीठापूरम सोडून देशभ्रमणार्थ निघाले. पीठापूरमहून काशी, बद्रिकेदार, जगन्नाथपुरी अशी तीर्थक्षेत्रे करून ते गोकर्ण महाबळेश्र्वर आले. तिथे त्यांनी तीन वर्षे वास्तव्य केले. तिथून ते श्रीशैल्य व श्रीगिरी येथे गेले तेथून अखेरीस कृष्णेच्या काठी वसलेल्या कुरवपूर येथे येऊन अवतारसमाप्तीपर्यंत राहिले. त्यांचे मंदिर, पादुका, तपश्चर्येची गुंफा, अनुष्ठान करीत असत ते औदुंबराचे झाड अजूनही आहे.


कुरवपूर हे ठिकाण दुर्गम असले तरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे स्थान कृष्णा नदीच्या पात्रात वसलेले आहे. या नदीचे पात्र जिथे विभाजित झाले तेथेच कुरगुड्डी नावाचे बेट तयार झाले. या बेटावर कुरवपूर हे गाव वसले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आधी रायचूरला जावे लागते. रायचूर हे रेल्वे स्टेशन मुंबई-चेन्नई या मार्गावर आहे.

कुरवपूर येथेे श्रीपाद श्रीवल्लभांचे वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ वास्तव्य होते. जवळच्या खेड्यात माधुकरी मागून ते उपजीविका करीत असत आणि रोज अनुष्ठान करीत असत. याच बेटावरील एका दगडाच्या गुहेत त्यांनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. इ. स. 1350 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांचे जीवन कार्य संपविले मात्र पुढे बऱ्याच काळापर्यंत या ठिकाणाची माहिती कोणालाही नव्हती.


श्रीनृसिंह सरस्वती (गाणगापूर)


श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या नंतरचा आणि श्रीगुरू दत्तात्रेयांचा तिसरा अवतार म्हणजेच श्रीनृसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभांचा कार्यकाल होता 1320 ते 1350. त्यांच्या अवतार समाप्तीनंतर 58 वर्षांनी म्हणजे इ. स. 1408 साली श्रीनृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपूर येथे ब्रह्मज्ञान देऊन पतीनिधनानंतर निराश झालेल्या अंबिका नावाच्या एका विधवेचा उद्धार केला. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही अशा निष्कर्षाप्रत येऊन, हे व्यर्थ जगणे संपवावे या निश्चयातून मुलासह आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेली अंबिका श्रीपाद श्रीवल्लभांच्या दृष्टीस पडली. तिची मनःस्थिती जाणून श्रीपाद श्रीवल्लभांनी अंबिकेला उपदेश केला तसेच तिला शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले आणि हे व्रत केल्यास तुला तेजस्वी पुत्र होईल असा वर दिला होता.


या वरप्रसादानुसार अंबिकेने विदर्भातील कारंजा गावी (जि. अमरावती) पुनर्जन्म घेतला. तिचे या जन्मातले नाव अंबाभवानी होते. तिचा विवाह माधव या ब्राह्मणाशी झाला आणि तिला तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहानुसार तेजस्वी मुलगा झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले नरहरी. हा मुलगा जन्मजात आपण कोणीतरी असामान्य आहोत याची लक्षणे दाखवू लागला. अन्य सामान्य बालके जन्मताच रडतात मात्र, नरहरीने जन्म होताच ओम्‌काराचा नाद केला, त्यामुळे आपल्या पोटी कोणीतरी महान विभूती जन्माला आल्याची खात्री त्याच्या मातेस लागलीच कळून आली.


या नवजात बालकाचे सारेच वागणे असामान्य होते. तो वयाने मोठा झाला तरी ओम्‌काराशिवाय काही बोलत नव्हता. पुढे जेव्हा त्याची मुंज करण्यात आली आणि त्याला गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली तेव्हा तो बोलू लागला. त्या बोलण्यामध्ये अधिकतर वेदांमधल्या ऋचाच असत. हे पाहून मातेला आनंद झाला असला तरीही तिचा तो आनंद अल्पकाळच टिकला. मुंज होताच त्या बालकाने मातेकडे तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती मागितली. माता अनुमती देईना. दीर्घकाळ तपश्चर्या करून पोटी जन्मलेले हे बाळ आपल्याला कायमचे अंतरणार या कल्पनेने ती दुःखी झाली. तिने बालकाच्या या निश्चयात मोडता घालण्याच्या दृष्टीने अनेक युक्तिवाद केले. संन्यास घेण्यासाठी आधी गृहस्थाश्रमी असले पाहिजे अशी अट असल्याचीही जाणीव करून दिली. मात्र, अशा अटी सामान्यांसाठी असतात. असामान्यांसाठी नाहीत हे त्या बालकास ठाऊक होते. त्याने आपल्या आईला, त्याचा जन्म संसार करण्यासाठी झालेला नसून जनहितार्थ झाला असल्याचे आवर्जून सांगितले. मात्र आईचा आग्रह कायम राहिल्याने अखेर आणखी काही दिवस आपल्या कुटुंबासह राहण्याचे नरहरीने मान्य केले. या घटनेला वर्ष उलटले तोवर त्या माऊलीच्या पोटी जुळ्या बालकांनी जन्म घेतला. दोनही पुत्रच निपजले.


अधिक विलंब न लावता, गृहसौख्यात दंग झालेल्या आपल्या मातेचा  निरोप घेऊन अखेरीस नरहरी करंज नगरीतून निघाले आणि थेट वाराणशीला पोहोचले. तिथे प्रगत शिक्षणाने या नरहरींचा पूर्ण विकास झाला, त्यांनी आर्त, दीनांना मार्गदर्शन करण्याचे सुरू केले. त्यामुळे अल्पकाळातच त्याची ख्याती वाढली. याच क्षेत्रात शृंगेरीच्या आचार्य परंपरेतील कृष्ण सरस्वती नावाचे यती वास्तव्यास होते. त्यांनी नरहरींना बोलावून घेतले आणि संन्यास दीक्षा घेण्याचे आवाहन केले. नरहरी मुळातच विरक्त असल्याने त्यांनी कृष्ण सरस्वती यांचे शिष्यत्व पत्करले आणि संन्यास ग्रहण केला. नरहरींचे नामकरण श्रीनृसिंह सरस्वती असे करण्यात आले.


संन्यस्थ अवस्थेत श्रीनृसिंह सरस्वती यांनी वाराणसी येथे काही दिवस वास्तव्य केले. याच काळात त्यांच्या भोवती शिष्यांचा मेळावा जमण्यास सुरुवात झाली. या शिष्यांना सोबत घेत ते प्रथम बद्रीकेदारास आले, त्यानंतर गंगासागरची यात्रा करून प्रयागक्षेत्री गेले. तिथे त्यांना सात सत्‌शिष्य लाभले. त्यांनी या शिष्यांमार्फत जनकल्याणाचे काम अतिशय प्रभावीपणे केले. शिष्यांच्या या प्रभावळीतील सिद्ध सरस्वती यांच्या प्रेरणेवरूनच पुढे गंगाधर सरस्वती यांनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला. गंगाधर सरस्वती हे श्रीनृसिंह सरस्वतींच्या परंपरेतील होते. त्यांनी श्रीनृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीनंतर 100 वर्षांनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला. श्रीनृसिंह सरस्वती यांच्या अवतारकार्यावरील हा ग्रंथ अवघ्या दत्त संप्रदायाचा अधिकृत ग्रंथ मानला जातो.


करंजनगरचा त्याग केल्यानंतर अदमासे तीस वर्षे श्रीनृसिंह सरस्वती महाराज उत्तर भारतात वावरत होते. उत्तरेतील कार्य संपवून श्रीनृसिंह सरस्वती यांनी दक्षिणेचा प्रवास सुरू केला. ही यात्रा सुरू करण्याआधी ते करंजनगरीत आले. तिथून भ्रमण करीत ते अमरापुरास आले. हे ठिकाण कृष्णा व अमरजा या दोन नद्यांच्या संगमावर आहे. आपल्या तपानुष्ठानाला हे ठिकाण योग्य आहे अशी खात्री पटल्याने श्रीनृसिंह सरस्वतींनी तिथे बारा वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या वास्तव्यामुळेच या गावाचे जुने नाव लुप्त होऊन त्याचे "नरसोबाची वाडी' असे नाव रूढ झाले. इथला बारा वर्षांचा कार्यकाळ संपताच ते गंधर्वपूर म्हणजेच गाणगापूर येथे आले आणि अवतार समाप्तीपर्यंत येथेच राहिले. या ऐहिक जगातील आपले कार्य संपल्याची जाणीव होताच श्रीनृसिंह सरस्वती यांनी अवतार समाप्तीचे ठरविले आणि श्रीशैल पर्वताकडे जाण्याचा निश्चय जाहीर केला आणि त्यासाठी त्यांनी जलमार्गाने प्रयाण केले. त्यांच्या जाण्यामुळे गाणगापूरवासी भक्त शोकाकूल झाले. श्रीनृसिंह सरस्वती यांनी त्यांची समजून काढली आणि श्रीशैल पर्वतावरील कर्दळीवनात जाऊन आपला अवतार संपविला (इ. स. 1458). कर्दळीवनात गुप्त होऊन ते उत्तरेतल्या घनदाट अरण्यात समाधी लावून बसले. हे अरण्य गंगेच्या उत्तरेस हस्तिनापूरनजिक छेली या गावाजवळ आहे. अनेक तापसी या अरण्यात तपश्चर्या करण्यात येत असत. या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती महाराज 300 ते 350 वर्षे समाधी लावून बसले होते. त्यांच्या शरीराभोवती वारूळ निर्माण झाले होते. याच वारुळातून प्रकट होऊन श्रीनृसिंह सरस्वती महाराज पुन्हा श्रीस्वामी समर्थ अवतारामध्ये वावरले असे समजले जाते. अशा रीतीने श्रीगुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व श्रीस्वामी समर्थ अशी ही दत्त संप्रदायातली अवतार परंपरा आहे.


>

श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)

अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांचा जन्म कोठे झाला याविषयीची माहिती कोठेही उपलब्ध नाही. मात्र, श्रीस्वामी समर्थांनी स्वत:विषयी सांगितलेली जी काही माहिती सूत्ररूपाने उपलब्ध आहे त्यावरून ते श्रीनृसिंह सरस्वतींचा अवतार आहे हे सूचित होते. सर्वसाधारणपणे श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीस्वामी समर्थ हे श्रीनृसिंह सरस्वती यांच्या नंतरचा श्रीदत्तात्रेयांचा चौथा अवतार आहेत असे मानले जाते.


एकदा श्रीस्वामी समर्थ महाराज आनंदात निमग्न असताना काही शिष्यांनी त्यांना "आपण कोण?' असा प्रश्र्न केला त्यावर श्रीस्वामी महाराजांनी, "दत्तनगर, मूळ, मूळ, मूळ पुरुष. वडाचे झाड' असे सांगितले. यावरून त्यांच्या अवताराचा संबंध श्रीगुरुदेव दत्ताशी जोडला जातो. स्वामी समर्थांनीही अनेकदा आपण कर्दळीवनातूनच आलो, तसेच काही भक्तांना गाणगापुरात आपणच होतो असेही सांगितले. अनेकांना साक्षात्कारातूनही याची जाणीव झाली. गाणगापुरास श्रीदत्तात्रेयांचरणी आलेल्या काही भक्तांना "आम्ही अक्कलकोटास आहोत तेव्हा तिथे येऊन सेवा करावी' असा दृष्टांत घडला यावरून श्रीस्वामींचा दत्तावताराशी असलेला दृढ संबंध ध्यानी येतो.


श्रीनृसिंह सरस्वती कर्दळीवनातून गुप्त झाले व उत्तरेकडे गेले. छेली गावाजवळच्या अरण्यात ते समाधीवस्थेत इतक्या दीर्घकाळ बसले की त्यांच्या देहाभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोड्या तेथे लाकडे तोडण्यासाठी आला असता त्याने अजाणतेपणी त्याच्या हातातील कुऱ्हाडीचा घाव झाडाऐवजी वारुळावर घातला. वारुळात ध्यानस्थ बसलेल्या श्रीनृसिंह सरस्वतींच्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव बसला आणि त्यांचा समाधीभंग झाला. त्या वारूळातून बाहेर पडलेले श्रीनृसिंह सरस्वती म्हणजेच श्रीस्वामी समर्थ. मांडीवर बसलेल्या त्या घावाचा व्रण श्रीस्वामींच्या मांडीवर दिसत असे.


एकदा एक ब्रिटिश वकील आपल्या पारशी मित्रासोबत श्रीस्वामी समर्थांना भेटावयास आला असता त्यांनी स्वत:विषयीची माहिती पुढीलप्रमाणे सांगितली, "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. त्यानंतर आम्ही गोदातटाकी आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत हिंडत आम्ही दक्षिण हैदराबादेस आलो. तेथे काही दिवस राहून मंगळवेढ्यास गेलो. तिथे बरीच वर्षे वास्तव्य करून नंतर पंढरपूर व बेगमपूर येथे हिंडत हिंडत मोहोळास आलो. मोहोळाहून सोलापुरास आलो व सोलापुरास काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे.'


कर्दळीवनातून निघाल्यावर पुढे श्रीस्वामी समर्थ महाराजांची भ्रमंती सुरू झाली. विविध ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी जनोद्धाराचे कार्य केले. त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य मराठवाड्यात होते. नंतर ते मंगळवेढ्यास आले. मोहोळ, माढा, पंढरपूर आणि सोलापूर परिसरातले त्यांचे हे सर्वांना ज्ञात असलेले आगमन होय. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे 1856 पासून अंतापर्यंतचे वास्तव्य अक्कलकोटातच होते. अक्कलकोटमधील त्यांच्या वास्तव्याचा काळ 22 वर्षांचा होता.